पुणे, दि.०९ : -पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीसाठी उद्या 10 नोव्हेंबर मतदान रोजी होत असून ही प्रक्रिया सुरळीत व शांततेत व्हावी यासाठी मतदान केंद्रांच्या परिघापासून 100 मीटर परिसराच्या आतील सर्व व्यवसायिक दुकाने, उपहारगृह, टपऱ्या आदी सर्व आस्थापना 10 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने जारी केले आहेत. या आदेशातून अत्यावश्यक सेवांची दुकाने, आस्थापनांना वगळण्यात आले आहे.
पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक 2021 कार्यक्रमांतर्गत 10 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात 14 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. हे मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये तसेच सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिघासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तीन मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये विशेष समिती सभागृह, दुसरा मजला, स्थायी समिती सभागृहासमोर, नवीन विस्तारीत इमारत, महापौर यांचे परिषद सभागृह, तिसरा मजला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहाच्या डाव्या बाजूस, नवीन विस्तारीत इमारत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दुसरा मजला, पुणे महानगरपालिका जुनी इमारत या तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे.