पुणे,दि१६ : -डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुलसीवृदांवन घेऊन काढलेली वरात… शुभमंगल सावधान् चे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या पारंपरिक वेशातील महिला आणि राधे कृष्ण, गोपाल कृष्ण…चा अखंड जयघोष अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुलसीविवाह सोहळा पार पडला. एरवी वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या व-हाडी मंडळींनी आज श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्याच चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्याकरीता प्रार्थना केली.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, संगीता रासने, सुलोचना रासने, खोपडे ताई, राजश्री गोडसे, मंगला खणसे, नलू चिंचोरकर यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे यंदा ३८ वे वर्ष होते.
दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पायी श्रीकृष्णाच्या मूर्ती साखरे महाराज मठाकडे नेण्यात आल्या. दगडूशेठ गणपती मंदिरापासून पायी समाधान चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मूर्ती व व-हाडी मंडळी आली. मठासमोर फुगडया घालत फेर धरुन महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठया संख्येने हजेरी लावली.