राशीनच्या बाजारातही केला होता चोरीचा प्रयत्न;कर्जत पोलिसांची पुन्हा एकदा कारवाई
कर्जत दि.२४:- राशीनच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चार महिला चोरांचा कट कर्जत पोलिसांनी नुकताच उधळून लावला होता. विशेष म्हणजे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलिसांच्या सतर्कतेने या महिलांना ताब्यात घेतले असून,आता त्याच महिलांनी कर्जतच्या आठवडे बाजारात(दि.२२ रोजी) दुपारी ३ वाजता एका लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम चोरल्याची कबुली चौकशी दरम्यान या महिलांनी दिली आहे.त्यांच्याकडून सोन्याचा बदाम मिळवण्यात यश आले आहे.
गुड्डी उर्फ राणी उर्फ सुनीता करण काळे (रा.पाथरुड ता.भूम जि.उस्मानाबाद),अश्विनी उपिन भोसले (रा.चिलवडी ता. कर्जत जि.अ.नगर) अशी या आरोपी महिलांची नावे असुन जयश्री अंगद पवार (रा.राजीवगांधी नगर कर्जत) यांच्या फिर्यादीवरून या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,कर्जत शहरात आठवडे बाजार असल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाजारात गस्त घालत होते.त्यावेळी एक महिला आरडाओरड करत होती.पोलिसांनी तिला काय झाले? अशी विचारणा केली असता ‘माझ्या नातीच्या गळ्यातील सोन्याचे बदाम बाजारातुन चोरीला गेले आहे’.पोलिसांनी तात्काळ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर शेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींची शोधाशोध केली.यावेळी २ संशयित महिला मिळाल्या.त्यांना ताब्यात घेत महिला पोलिसांमार्फत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचा बदाम मिळाला.चोरीस गेलेला बदाम हाच असल्याची खात्री झाल्यानंतर अंगद पवार या महिलांवर कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस अंमलदार प्रवीण अंधारे, उद्धव दिंडे, शाहूराज तिकटे, सलिम शेख, अर्जुन पोकळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी पुरी, जयश्री गायकवाड, कोमल गोफने आदींनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे