औरंगाबाद,दि.२४:- संपूर्ण देशभरात आता कोरोना आटोक्यात आला असताना कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असताना अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं होतं.त्यात कोरोना लसीकरण मोहीम राबवली जात असताना सध्या याला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि नागरिकांनी लसीकरणात सहभागी व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरण केलं नसेल तर दुकानदारन ग्राहकाला दारू देण्यात येऊ नये, असे आदेश जारी केले आहेत.दारू विक्री करणाऱ्या दुकानातील सर्व कर्मचारी व मालकाचे दोन्ही लसीचे डोस पुर्ण होणं बंधनकारक असणार आहे. तसेच दारू विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना लसीचा किमान एक डोस पुर्ण होणं गरजेचं आहे.