पुणे,दि१९ : – पुण्यात होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “सनबर्न होळी पार्टी”त धुलिवंदनादिवशी तरूणाई कर्कश डीजेच्या तालावर अन मद्याच्या नशेत थिरकली. दीड हजारांच्या उपस्थित कार्यक्रमाची परवानगी घेऊन तीन हजार पेक्षा ही जास्त तिकीटे विकली अन् नियमांचा भंग केल्याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशीरापर्यंत होळी पार्टी चालू आल्याने हडपसर पोलीसांकडे प्राप्त झाल्या आहेत. परंतु, शंभरहून अधिक मोबाईल चोरी झाल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजक बिग ड्रीम्स ईव्हेंटचे आर्यन नवले व त्याचे पार्टनर तसेच फुल सर्कल इव्हेंटचे गिरीष शिंदे तसेच इतर आयोजक व डीजे मालक उदय शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अमानोरा मॉलमध्ये सनबर्न होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीबाबत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेतली गेली होती. दिड हजार व्यक्तींनाच या पार्टीत समावेश देणे अपेक्षित होते. त्यानुसारच परवानगी देण्यात आली होती. या पार्टीत सनर्बन डि. जे. कशीर यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.शुक्रवारी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. परंतु, या पार्टीत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच जवळपास तीन हजाराहून अधिक तरुण अन तरुणाई सहभागी झाली होती. तीन हजार तिकीटे विक्री करण्यात आल्याचे पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे पोलीसांकडून परवानगी घेताना या पार्टीत मद्याचा अन कोरोना नियमांचे पालनकरून सोशल डिस्टसिंग करणे गरजेचे असल्याची सूचना देण्यात आली होती.
परंतु, हे नियम पाळल गेले नसल्याचे दिसून आले आहे. डीजेचा दणदणाट अन तरूणाईचा मद्याच्या नशेतील डान्स या पार्टीत झाल्याची माहिती पोलीस सुत्रांची आहे. कोरोना उतरणीला लागलेला असला तरी शासनाकडून नियम अद्यापही जारी आहेत. त्यात ही पार्टी आयोजित झाली असून, त्याची चर्चा शहरभर होती. दरम्यान, या पार्टीचे बिंग मोबाईल चोरीमुळे फुटल्याचे वास्तव आहे. पार्टीत तरूण- तरूणाईचे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले.रात्री उशीरा या घटना समोर येऊ लागल्यानंतर तरुणांनी हडपसर पोलीसांकडे धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत २१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मोबाईल चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.दरम्यान, जवळपास शंभर मोबाईल येथून चोरीला गेल्याचे बोलले जात होते. परंतु, पोलीसांकडे तक्रारी कमी प्राप्त झाल्या आहेत. तत्पुर्वी पार्टीत मद्य असल्याने तरूणाई मद्याच्या नशेत देखील होती. त्यात अनेकांचे मोबाईल गहाळ झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.