कर्जत, दि.०५ :- सर्वसामान्य नागरीकांवर दहशत निर्माण करून शिवीगाळ करणे,मारहाण करणे, अल्पवयीन मुलींची छेड काढणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांतील मिरजगावमधील तिघांना कर्जत पोलिसांनी आता चांगलाच दणका दिला आहे.अशा गुन्हेगारांच्या विरोधात आता कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी मोहीम उभारली असून कोणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही असा अल्टिमेटमच त्यांनी दिला आहे.
या तिघांवर विविध कलमान्वये कारवाई करून कर्जत पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.विशेष म्हणजे या तिघांमधील एक आरोपी गेली दीड वर्षांपासुन फरार झाला होता त्यास देखील कर्जत पोलिसांनी अटक केली असुन तो मागील दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला अविनाश महादेव मराळ (रा.मिरजगाव पिरगल्ली) हा विनाकारण त्रास देत होता. सदर मुलगी ही आपल्या घरासमोरून जात असताना आरोपीने तिची गाडी थांबवून तू माझ्याशी का बोलत नाहीअसे म्हणून अश्लील वर्तन केले त्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने तो तिला ओरडू नको नाहीतर मी तुला सोडणार नाही असे म्हणून तो निघून गेला. आरोपी अविनाश मराळ यावर भा.द.वी कलम २२३,३५४ बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर करण ईश्वर पवार (रा.मिरजगाव) यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत दामोधर सोनवणे (रा.मिरजगाव) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी हा फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीची आई मीरा ईश्वर पवार हिस विनाकारण अश्लील शिवीगाळ केली.शिवीगाळ का करतो?असे विचारल्याने आरोपीला राग आल्याने त्याने त्याने फिर्यादिस शिव्या देत जवळ पडलेला दगड हातामध्ये घेऊन फिर्यादीच्या डाव्या पायावर व पाठीवर मारला.फिर्यादी घाबरून घरात गेला असता आरोपी त्याच्या मागे पळत जाऊन घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.फिर्यादीची आई मध्ये आली असता तिलाही चापटाने मारहाण करत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.व माझ्या नादी लागाल तर कोयत्याने हातपाय तोडीन अशी धमकी दिली.आरोपीवर भा.द.वी कलम ३२४,४५२,३५४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिसरा आरोपी नामे निलेश कान्हू नवले, २४, रा मिरजगाव याने काही मुलांना जमवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करून त्यास एक दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते.
या तसेच आणखी काही इस्मानविरुद्ध तक्रारी आहेत, आणखी कारवाई करण्यात येणार आहे.
..तर थेट करा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!
कुणीही जर सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देत, असेल दंगा करत असेल तर अशांची दादागिरी, दहशत कदापि खपवून घेतली जाणार नाही.नागरिकांनी थेट आपल्या पोलीस ठाण्यात न भिता आपली तक्रार दाखल करावी. अशा वाईट प्रवृत्तींचा आम्ही चांगलाच बंदोबस्त करू.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस हवालदार बबन दहिफळे, प्रबोध हांचे, रवी वाघ, जितेंद्र सरोदे आदींनी केली आहे.