पुणे,दि.३०:- पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक
2022 चे पुण्यातील 58 प्रभागातील 173 जागांसाठी मंगळवारी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणासाठी सोडत होणार आहे.या सोडती मध्ये मागील टर्म मध्ये प्रतिनिधित्व केलेल्या 165 नगरसेवकांपैकी किती जणांना पुन्हा उमेदवारी मिळणार याचे चित्र काही अंशी स्पष्ट होणार आहे. आरक्षणानंतर खऱ्या अर्थाने ‘ दल बदलायच्या ‘ घडामोडीना वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या अनुसूचित जातीच्या 23, जमातीच्या 2 आणि महिला आरक्षणाच्या एकूण 87 जागांसाठी गणेश कला क्रीडामंच येथे सोडत होणार आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या 25 जागा आणि प्रभाग निश्चित झाले आहेत. तर एकमेव असलेल्या प्रभाग क्र. 13 सुस बाणेर या द्विसदस्यीय प्रभागातील एका जागेवरील महिला आरक्षण निश्चित आहे.
—
मागील निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह महिला आरक्षण असले तरी आपल्याला संधी मिळणार अशी सर्वच पक्षातील इच्छुकांना अपेक्षा होती. त्याप्रमाणे ती पूर्ण ही झाली. परंतु यंदा त्रीसदस्यीय रचना असल्याने एका नगरसेवक अथवा नगरसेविकेचा पत्ता कट होणार हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. तर तूर्तास ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निर्माण होणाऱ्या स्पर्धेतून काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उद्या आरक्षण सोडती निमित्ताने तिसऱ्या टप्प्यात काहीजणांना घरी बसावे लागणार आहे, यामुळेच आरक्षण सोडती बाबत उत्सुकता वाढली आहे