पुणे, दि. ८:- पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट अकरा गावांचे प्रलंबित प्रश्न गतीने सोडविण्यासाठी महानगरपालिका उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करावी, असे सांगून महानगरपालिका व अन्य संबंधित अधिका-यांची आणि गावातील दोन नागरिक यांची समन्वय समिती स्थापन करावी, अशा सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट अकरा गावांचे प्रश्न सोडविण्याबाबत श्री शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम, संदीप खांडवे, विजय शिंदे, नगरपालिका प्रशासन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री शिवतारे म्हणाले, अकरा गावांमधील प्रत्येक गावचे तत्कालीन सरपंच व उपसरपंच किंवा दोन सदस्य तसेच महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे अधिकारी यांची येत्या आठ दिवसात समन्वय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमार्फत गावातील सदस्यांनी या गावच्या समस्या प्रशासनाकडे मांडण्याबरोबरच वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांचे निराकरण करावे. यावेळी डीपीआर, पाण्याच्या टाक्या, अपुरा पाणीपुरवठा, विविध कर वसुली, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, पथदिवे, आरोग्य आदी विषयांबाबत चर्चा होऊन त्यावर उपाय सुचविण्यात आले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, महानगरपालिका उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, जेणेकरून या गावांचे प्रश्न सोडविले जातील.
यावेळी या समाविष्ट गावांमधील नागरिकांनी विविध समस्यांची माहिती दिली. तसेच मुलभूत सुविधा देण्याबाबत आवाहन केले. यावेळी समाविष्ठ गावांचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.