पुणे,दि.२३:- काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पुण्यातील नाना पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास राजेवाडी परिसरात घडली आहे. भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, रोहित काउंटर, अतिश फाळके, आदित्य केंजले, उषा कूचेकर (रा. सर्व, राजेवाडी, नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, रोहन रवींद्र पवार (राजेवाडी, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. जुन्या वादातून खून झाल्याची माहिती समर्थ पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी महिलेसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत रहोन पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वी भांडण झाले होते.या भांडणाच्या रागातून आरोपींनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रोहन याला घरातून बाहेर बोलावले.त्यानंतर आरोपी सुशांत कुचेकर याने त्याच्यावर कोयत्याने वार केले.
तर तेजस जावळे याने चाकूने अंगावर आणि तोंडावर वार केले.
इतर आरोपींनी त्याच्या तोंडावर आणि अंगावर विटांनी मारहाण केली.यामध्ये गंभीर जखमी होऊन रोहन याचा जागीच मृत्यू झाला.पुढील समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.