पुणे,दि.२२:- पिंपळे सौदागर येथील एका तरुणाची जमीन लाटण्यासाठी त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर अंगठे व सह्या घेतल्याचा आरोपावरून अटकेत असलेली नानासाहेब गायकवाड टोळीतील सोनाली गवारे हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. फिर्यादी यांच्यावतीने सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी यासंदर्भात कामकाज पाहिले.
फिर्यादी काटे यांची रायगड येथील ७ एकर जमीन तर पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने नावावर करून घेतल्याच्या आरोपावरून नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला होता. काटे यांच्या कुटुंबियांना घरी बोलवून त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावत हवेत गोळीबार केला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.
याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे, राजू उर्फ अंकुश दादा, सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याबाबत ६२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती.
फिर्यादी या पिंपळे सौदागर परिसरात राहतात. त्यांची रायगड जिल्ह्यात ७ एक्कर जागा होती. दरम्यान, फिर्यादी यांच्या मुलाने त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.या व्याजाच्या पैशाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला घरी बोलावले. त्यानंतर त्यांची रायगड येथील 7 एक्कर जागा व पिंपळे सौदागर येथील फिर्यादी यांच्या नावावर असलेली जागा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी धमकवला. तर नानासाहेब गायकवाड यांनी त्यांच्याजवळ पिस्तुल काढत हवेत गोळीबार केला. तसेच फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला पिस्तुल लावत जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला. जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या व अंगठे घेतले. त्यानंतर सोनाली गवारे हिच्या डेक्कन येथील घरात काही काळ डांबून ठेवत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.