पुणे दि. 20 : सुदृढ आरोग्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य चांगले असेल तरच चांगले काम होवू शकते. त्यामुळे तणावमुक्तीसाठी प्रत्येक शासकीय विभागात क्रीडा संस्कृती रुजण्याची आवश्यकता असल्याचे मत क्रीडा आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी आज व्यक्त केले.
महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र शासन आणि सचिवालय जिमखाना मुंबई यांच्यावतीने आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन आणि लॉन टेनिस स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सन्मान श्री भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सहसंचालक (क्रीडा) नरेंद्र सोपल, बॅडमिंटन स्पर्धेचे निमंत्रक अश्विनी कुमार, लॉन टेनिस स्पर्धेचे निमंत्रक नरेन्द्र कुमार, बॅडमिंटन स्पर्धेचे सचिव सुहास चव्हाण, टेनिस स्पर्धेचे सचिव अनिरुद्ध देशपांडे, उदय साने, राजू देसाई उपस्थित होते.
श्री पुरूषोत्तम भापकर म्हणाले, शासकीय विभागात दैनंदिन काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या तणावांचा सामना करावा लागतो. खेळ हे तणावमुक्तीचे मुख्य साधन आहे. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व द्यावे. शासकीय विभागात काम करणाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
बॅडमिंटन स्पर्धेतील सर्वसाधारण महिलांच्या संघाचे विजेतपद आर.सी.बी. मुंबई यांना तर सर्वसाधारण पुरूषांच्या संघाचे विजेतपद आर.सी.बी. चंदिगड यांना मिळाले. लॉन टेनिस स्पर्धेतील सी.एस. दिल्ली संघ सर्वसाधारण विजेता ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विन कुमार यांनी केले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून बॅडमिंटन स्पर्धेकरिता 40 संघ सहभागी झाले होते. तर लॉन टेनिस स्पर्धेकरीता एकवीस संघ सहभागी झाले होते.
समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*स्पर्धेमधील महाराष्ट्रातील विजेते*
– समीर भागवत आणि नेहा पंडीत (बॅडमिंटन) मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक.
– नेहा पंडीत आणि श्रृती मुंदडा (बॅडमिंटन) महिला दुहेरीत सुवर्ण पदक.
– आर.एस.बी. मुंबई (बॅडमिंटन) सर्वसाधारण विजेतेता महिला संघ.
– आर.एस.बी. मुंबई (बॅडमिंटन) पुरुष संघ व्दितीय स्थानी.
– प्रदीप जगदाळे आणि संध्याराणी बंडगर यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण.
– संध्याराणी बंडगर (टेनिस) महिला वैयक्तिक रौप्य पदक .
– संध्याराणी बंडगर आणि सोनाली सोनार (टेनिस) महिला दुहेरी रौप्य पदक.
– सोनाली सोनार आणि राजाराम देवकर (टेनिस) मिश्र दुहेरी कास्य पदक.