मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकताच राज्याचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प जाहीर केला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प महाराष्ट्राबरोबरच पुणे जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. पाहुया अर्थसंकल्पातील पुण्याच्या विकासाचे प्रतिबिंब …
*शिवछत्रपतींना मानाचा मुजरा*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त २ ते ९ जून २०२३ या कालावधीत हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हवेली तालुक्यात आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान निर्मितीसाठी ५० कोटी रुपये, तसेच किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची शपथ रायरेश्वर मंदिरात घेतली. जिल्ह्यात स्वराज्य निर्मितीची गाथा सांगणारे गड-किल्ले आहेत. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने आपला वैभवशाली आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होणार आहे आणि त्या माध्यमातून नव्या पिढीलादेखील प्रेरणा मिळेल.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर, ता. हवेली व समाधीस्थळ वढू (बु.), ता. शिरुर येथील स्मारकाच्या विकासासाठी २७० कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी २०२३-२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
*अमृत काळातील पंचामृत*
अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित असून त्यातील शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह, सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती; सक्षम कुशल- रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास ही ध्येये साध्य करण्यासाठी योग्य नियोजन या अर्थसंकल्पात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे.
*शेतकरी केंद्रस्थानी*
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना जाहीर केली असून याद्वारे प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या ६ हजार रुपयांत तेवढीच भर राज्य शासनाची घालण्यात येणार असल्याने १२ हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
*स्वच्छ शहरे, सुंदर गावे*
शहरे जलशाश्वत करण्यासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून पाणीपुरवठा योजना प्रकल्प हाती घेणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून मलनिस्सारण प्रकल्प, मलजलवाहिनी, साठवलेल्या कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प आदी हाती घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधांच्या निर्मितीसाठी यामुळे मदत होणार आहे.
*सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी*
पुण्यात मुख्यालय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यासह राज्यातील इतर महामंडळांच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*पायाभूत सुविधा*
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने २७ हजार कोटी रुपये खर्चाच्या पुणे बाह्यवळण मार्गाचे काम सुरू असून २०२३-२४ मध्ये भूसंपादनासाठी पुरेसा निधी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग आता आणखी वेगवान होणार आहे. त्यासाठी खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून बांधकामासाठी ६ हजार ६९५ कोटी रुपयांच्या सुधारित किमतीस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*सुरक्षित प्रवास आणि विकासाला गती*
मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गासह समृद्धी महामार्गावर राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर मुंबई- कोल्हापूर, नाशिक- पुणे, अहमदनगर- पुणे या महामार्गावरदेखील ही प्रणाली राबवण्यात येणार असून त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना या महामार्गांवर सुरक्षित प्रवासाची हमी मिळण्यासोबत जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.
केंद्र शासनाच्या ‘रिड्यूस, रियुज, रिसायकल’ या तत्त्वावर आधारित सर्क्युलर इकॉनॉमी पॉलिसीला अपेक्षित उद्योग उभे रहावेत यासाठी पुणे शहरासह राज्यातील सहा ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्याचा मानस जाहीर केला आहे. यामुळे एका उद्योगावर आधारित इतर उद्योग उभे राहणार असून यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासह अर्थव्यवस्थाही गतीमान होणार आहे.
*मेट्रो : पुण्याचे भूषण*
पुणे शहरात मेट्रोमार्गांचा विकास गतीने सुरू असून पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो या २३.३ कि.मी. च्या प्रकल्पाचे काम प्रगतीत आहे. महामेट्रोमार्फत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पाचे कामही गतीने सुरू आहे. आता पिंपरी- चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवले असून मान्यता मिळाल्यानंतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे भविष्यातील पुण्याच्या दळणवळण व्यवस्थेला निश्चितपणे आकार देतील.
*गावांमध्ये व्हावी रोजगारनिर्मिती*
गावांमध्येच रोजगारनिर्मिती व्हावी, स्वयंरोजगार सुरू व्हावेत आणि गावांकडून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबावे या उद्देशाने ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनाही लाभ होईल.
राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी ५०० कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे शहरातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे तंत्रज्ञान विद्यापीठ यांचाही समावेश आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील.
आजच्या धकाधकीच्या आणि ताण-तणावाच्या काळात मानसिक स्वास्थ्य हरवत चालले आहे. त्याचा परिणाम व्यसनाधीन होण्यावरही होतो. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य व व्यसनाधीनता दूर करण्यासाठी पुणे येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० युवकांना जलपर्यटन, साहसी पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन आदी तसेच आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याचा संकल्प हा तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यात दहा पर्यटनस्थळांवर ‘टेंट सिटी’ उभी करण्याचा निर्णय हा पर्यटन विकासाला गती देण्याबरोबरच तेथील रोजगार निर्मितीलाही चालना देणारा आहे.
*आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचे ध्येय*
शिवछत्रपती क्रीडा संकुलामुळे पुणे ही राज्याची क्रीडा पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील अनेक खेळाडुंनी येथील सुविधांचा लाभ घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यशाचा हा आलेख आणखी पुढे नेण्यासाठी आणि खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबविण्यात येणार असून बालेवाडी येथे ‘स्पोर्टस सायन्स सेंटर’ विकसित करण्यात येणार आहे.
*पर्यावरणपूरक विकासासाठी हरित चळवळ*
राज्यात पर्यावरण पूरक विकासासाठी ‘शून्य उत्सर्जन’ या संकल्पनेला गती देण्यात येणार असून त्यासाठी हरित उर्जा निर्मितीसाठी हरित गुंतवणूक, ग्रीन बाँड, ग्रामपंचायतींमध्ये सौर उर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. खासगी वाहनधारकांनी ८ ते १५ वर्षांच्या आत वाहने स्वेच्छेने निष्कासित केल्यास नवीन वाहन खरेदीला अनुदान देण्यात येणार आहे.
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींची उत्सुकता शमविण्यासह वनपर्यटनाला चालना देण्यासाठी शिवनेरी, ता. जुन्नर येथे बिबट सफारी सुरू करण्यात येणार आहे.
*निर्मल वारी आणि तीर्थक्षेत्र विकास*
पंढरपूरचे श्री विठ्ठल हे राज्यातील जनतेचे दैवत. आपल्या दैवताला भेटण्यासाठी आषाढी वारीच्या माध्यमातून जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्मल वारीची संकल्पना राबवण्यात येत आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकोबाराय यांच्या पालखीसोबतच श्री संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांच्या वारीकरिता २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगासह राज्यातील पाचही ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आणि परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार ओहत.
संत तुकाराम महाराज यांच्या टाळकऱ्यांपैकी एक असलेले संत जगनाडे महाराज यांच्या जीवनाचा परिचय नवीन पिढीला व्हावा यासाठी सुदुंबरे, ता. मावळ येथे त्यांच्या समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
*भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक*
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील भिडेवाडा येथे सुरू केली होती. त्यांच्या महान कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी म्हणून या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एकूणच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रात भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केली असून पुणे जिल्ह्याला याचा विशेष लाभ होणार आहे. हा अर्थसंकल्प जिल्ह्याच्या विकासाला बळ देणारा आणि विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा ठरेल यात शंका नाही.
-सचिन गाढवे, माहिती अधिकारी पुणे