पुणे दि.१५- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्यातील तरुणाई पुढे आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नवमतदार आणि नागरिकांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.
स्वीप अंतर्गत वैद्य वसाहत मंजाळकर चौक, गोलंदाज चौक, हेल्थ कॅम्प पांडवनगर, गुजाळवाडी, वडारवाडी, मारुती मंदिर येथे विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांशी मतदार जागृतीसाठी संवाद साधला. त्यांना क्युआर कोडचा उपयोग करून मतदार यादीत नाव शोधण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
हा उपक्रम कलाकार कट्टा, गुडलक चौक, रुपाली हॉटेल, फर्ग्युसन रोड, वैशाली हॉटेल , फर्ग्युसन महाविद्यालय, मुख्य प्रवेशद्वार, हॉटेल अण्णा इडली सांबर आपटे रोड, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महाल हॉटेल, कृषी महाविद्यालय चौक, डेक्कन जिमखाना बस स्थानक, संभाजी उद्यान या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून राबविण्यात येत आहे.
शनिवार १६ मार्च रोजी रोजी वैद्य वसाहत मंजाळकर चौक, गोलंदाज चौक, हेल्थ कॅम्प पांडवनगर गुजाळवाडी, वडारवाडी, मारुती मंदिर या ठिकाणी १०-१० विद्यार्थ्यांचे गट करून सर्व मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसामध्ये साधारणपणे ८४० नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आहे. या उपक्रमासाठी डॉ. नंदकुमार बोराडे, डॉ.मीनाक्षी सुरेश, राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक, स्वीप समन्वयक दिपक कदम व सागर काशिद यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले
मतदार जागृतीसाठी महिलांचा मेळावा
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात बचत गटातील महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांची नोंदणी आणि मतदानाचे आवाहन करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी डेक्कन परिसरातील नदी पात्रातील राजपूत वीट भट्टी या ठिकाणी महिला बचत मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. महिलांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे आपल्या परिचयातील महिलांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय बोपोडी येथेदेखील अशाचप्रकारे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.