लोणावळा,दि.०८ :- लोणावळ्यात एका बंगल्यात रात्री उशिरापर्यंत डिजे सिस्टिमच्या तालावर नर्तिकांसोबत नाचत आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दहा जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी ( 6 एप्रिल ) मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहा मुलींचा समावेश असून लोणावळा शहर पोलीस आल्याची चाहूल लागताच काही तरुण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्यांच्या चारचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी माहिती दिली की, लोणावळा शहरात तुंगार्ली परिसरातील एस -4 नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत डिजे सिस्टम लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत आहेत अशी गोपणीय माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी व लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस स्टाफ यांची संयुक्त टिम तयार करत करवाई करण्यात आली.यामध्ये 9 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांच्या लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांनी त्यांच्याकडील बंगले भाड्याने देताना बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सत्यसाई कार्तिक व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. त्याच प्रमाणे लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणा-या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले असल्याचे सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, पोलीस हवालदार मयूर आबनावे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई सोनवणे, महिला पोलिस शिपाई निंबाळकर, पोलीस शिपाई शिंदे, येळवंडे, घोंगडे, पवार यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जोशी हे करत आहेत