पुणे,दि.२६ :- ‘स्विगी’ या ॲप कंपनीने पुण्यातील ‘ब्ल्यू नाईल’ या हॉटेलची ५६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
प्रकार २६ मार्च ते ७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्विगी कंपनीचे व्यवस्थापक संदीप शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी ब्ल्यू नाईल रेस्टॉरंटच्या अकाऊंट हेड विद्यागौरी भावकर (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. बंडगार्डन पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी ‘ब्ल्यू नाईल रेस्टॉरंट’मध्ये अकाऊंट हेड आणि सेक्रेटरी म्हणून १९९१ पासून काम करीत आहेत.
ब्ल्यू नाईल रेस्टॉरंटकडून पुण्यातील ग्राहकांना या डिलिव्हरी ॲपद्वारे खाद्य पदार्थ पोहोचवले जातात. यातील स्विगी कंपनीसोबत ब्ल्यू नाईलचा २०१५ साली करार झालेला आहे. तेव्हापासून स्विगी कंपनीमार्फत ऑनलाईन खाद्य पदार्थ पाठविण्यास सुरुवात झाली. ब्ल्यू नाईलचे अनेक ग्राहक स्विगीच्या ॲपवरून हव्या असलेल्या खाद्य पदार्थांची ऑर्डर देतात. ही ऑर्डर ब्ल्यू नाईल रेस्टॉरंटद्वारे स्वीकारल्यानंतर स्विगीचे डिलिव्हरी बॉय रेस्टॉरंटमधून पदार्थ घेतात आणि ग्राहकांना देतात. ग्राहकांनी ऑनलाईन अथवा रोखीने दिलेले बिलाचे पैसे स्विगी कंपनीला मिळतात. त्यानंतर कंपनी रेस्टोरंटच्या बँक खात्यावर ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’द्वारे ट्रान्सफर करते. ही रक्कम जमा करण्याचा कालावधी एक आठवड्याचा म्हणजेच रविवार ते शनिवार असा असतो. हा व्यवहार स्विगी कंपनीचे येथील मॅनेजर संदीप शर्मा पाहात होता.
मार्च २०२३ पासून स्विगीकडून रेस्टॉरंटला मिळणाऱ्या पैशांमध्ये खंड पडू लागला. करारामध्ये ठरल्याप्रमाणे स्विगी कंपनीने रेस्टॉरंटचे पैसे वेळेत दिले नाहीत. रेस्टॉरंटकडून ८ नोव्हेंबर २०२३ पासून स्विगी कंपनीसोबतचे व्यवहार पूर्णपणे थांबवण्यात आले. तसेच, थकीत रक्कम पाठविण्याबाबत मॅनेजर संदीप शर्माला वेळोवेळी फोन, ईमेलद्वारे संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने १५ ते २० दिवसांत पैसे जमा होतील असे ईमेलद्वारे कळवले होते. परंतु, अद्याप रेस्टॉरंटचे पैसे जमा झालेले नाहीत. अशाप्रकारे स्विगी कंपनीने ब्ल्यू नाईल रेस्टॉरंटची ५४ लाख ६२ हजार ७८६ रुपयांची थकबाकी न देता तसेच कंपनीचा १ लाख ३७ हजार ९६ रुपयांचा टीडीएस न भरता एकूण ५५ लाख ९९ हजार ८८२ रुपयांची अर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.