पुणे,दि.२५:- मोबाईलवर कोणाशी चॅटिंग करते, याचा जाब पती व माहेरच्यांनी तिला विचारला असता, ३४ वर्षीय पुनम जिग्नेश शिंदे या विवाहित महिलेने बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील मंचर येथे गुरुवार, दि.२३ रोजी घडली आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नरेंद्र निघोट हे कुटुंबासमवेत अष्टविनायक सोसायटी मंचर डोबीमळा (ता. आंबेगाव) येथे राहत असून त्याच सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांची बहीण पुनम जिग्नेश शिंदे, तिचा पती व मुलासोबत राहण्यास आहे.
गुरुवार दि.२३ रोजी पहाटे तीन वाजता फिर्यादी निघोट यांचे मेहुणे जिग्नेश शिंदे हे पत्नी पूनम व मुलगा मयंक यांना सोबत घेऊन त्यांच्या घरी आले व त्यांनी तुझी बहीण ही दुसऱ्या मुलासोबत मोबाईलवर रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत असते, असे सांगितले.
त्यावेळी नरेंद्र निघोट यांनी त्यांना घरात घेत आपण काय आहे ते सकाळी पाहू, असे सांगितले. त्यानंतर सकाळी त्यांनी त्यांचे नातेवाईक यांना मंचर येथे बोलावून घेतले व जिग्नेश व बहीण पूनम यांच्याशी चर्चा केली. पुनम ज्याच्या सोबत मोबाईलवर चॅटिंग करत होती. तो मुलगा खडकी पिंपळगाव येथील असल्याने त्याला फोन केला असता तो सायंकाळी पाच वाजता तुमच्याकडे येतो, असे त्याने सांगितले.असे त्याने सांगितले.
त्यानंतर त्या मुलाला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्याच वेळी सर्वजण घरात असताना पूनम जिग्नेश शिंदे राहत असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन तिने टेरेसवरून खाली उडी मारली.
उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे घोषित केले. मंचर पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पुढील तपास करत आहे.