पुणे,दि.२३:- : शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा आणि फुलांची उधळण… जय भवानी, जय शिवराय… छत्रपती संभाजी महाराज की जय चा अखंड जयघोष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला. भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होता.
विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन व रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी सरदार जेधे घराण्याचे वंशज दिग्विजय जेधे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप यांसह शिवभक्त उपस्थित होते.
अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे सातवे वर्ष होते. छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले. पूजनाकरिता विविध किल्ल्यांवरील पवित्र माती आणि पाणी आणण्यात आले होते.
किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. यासाठी किल्ले सिंहगडावर आम्ही हा सोहळा दरवर्षी आयोजित करतो. सर्व शिवभक्तांनी आपापल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा आयोजित करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.