पुणे ८:- पुणे खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात सुरू केली आहे. दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून ही कपात सुरु असून आवश्यकता भासल्यास १ दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असे सूतोवाच पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये केले. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत. पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे गटनेते संजय भोसले, आरपीआयच्या सुनिता वाडेकर, मनसेचे वसंत मोरे, एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांच्यासह आयुक्त सौरभ राव व पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरु करण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दहा टक्के पाणी कपात सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पुण्याच्या पूर्व भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असून त्यामुळे याभागातील अडचणी वाढल्या आहेत. त्यावेळी याविषयाचा खुलासा झाला. धरणामध्ये २.२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. तर आगामी पालखी, बाष्पीभवन आणि दौंडसाठी १.२ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निम्म्या पुण्याला एक दिवसाआड पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालिका दररोज १३५० एमएलडी पाण्याचा पुरवठा करते. हा पुरवठा १११५ एमएलडीवर आणण्यात आला आहे. आणखी आठ दिवस पावसाची वाट पाहून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या काळात पाऊस झाला तर कदाचित हा निर्णय घेतला जाणार नाही.
याबाबत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांची भेट घेऊन पाणी कपात सुरु केली आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पालिकेला 31 जुलैपर्यंत ठरवून दिलेल्या कोट्यानुसारच पाणी दिले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात जलसंपदा विभागाने केलेली नाही असे स्पष्ट केले.
कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढू लागली असून धरणामधील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. संभाव्य पाणी टंचाईचा विचार करुन वडगाव जलशुद्धीकरण केंद्राकडून पुण्याच्या दक्षिण भागामध्ये आठवड्यामधून एक दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १० जूनपासून केली जाणार आहे.