.मुंबई दि,, २२:- जून मान्सूनचे आगमन १५ जून रोजी कोकणात झाले असले तरी अद्यापि मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाची शक्यता आणि प्रमाण कमी राहणार आहे. २६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.