पुणे दि,०३ :- प्रतिनिधी संकेत संतोष काळे, पुणे येरवडा कारागृहात कैद्यांकडून कालच शाहरुख शेख आणि तुषार हंबीर या दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर लगेचच हंबीरच्या समर्थक कैद्यांनी एका तुरुंगाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली होती. आज पुन्हा एकदा पाच-सहा कैद्यांनी मिळून एका कैद्याला बेदम मारहाण केली आहे. या कैद्याच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. कारागृह अधीक्षक यु. टी. पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.कि
कारागृह अधीक्षक यु. टी. पवार यांच्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी ५ ते ६ कैद्यांनी मिळून मोहम्मद जबाल नदाफ नामक कैद्याला बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांकडे याबाबत चौकशी सुरु असून या चौकशीनंतर या हाणामारीचे कारण स्पष्ट होईल.
तत्पूर्वी काल (मंगळवार) रात्रीच्या घटनेत गंभीर जखमी झालेला कैदी तुषार हंबीर याच्यावरही ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर लगेचच कारागृहात हंबीर याच्या १४ समर्थक कैद्यांनी तुरुंगाधिकारी संदीप रतन एकशिंगे यांच्यावर बराकीची पाहणी करीत असताना हल्ला चढवला. यामध्ये झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्यांनाही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
राहुल तुपे, अक्षय हाके, यशवंत सूर्यवंशी, पृथ्वीराज सूर्यवंशी, गौरव जाधव, राहुल पानसरे, अक्षय चौधरी, अनिकेत जाधव, अक्षय इंगळकर, संजय औताडे, अनिल सोमवंशी, शिवशंकर शर्मा, प्रविण सुतार आणि निखिल पाटील या १४ जणांनी मिळून एकशिंगे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मारहाण करणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कैद्यांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.