.पुणे दि. ०९ :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासंदर्भात केंद्रीय सहसचिव सुषमा तायशेटे यांनी शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची व कान्हूर मेसाई येथे गावशिवारातील कामांची पाहणी करून ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह चारा छावणीतील पशुपालकांशीही संवाद साधला. जलशक्ती अभियानाबाबत मार्गदर्शनासाठी केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांच्या पथकाने आज शिरूर तालुक्यातील चिंचोली (मोराची) व कान्हूर मेसाई येथील शेतकरी, ग्रामस्थांशी चर्चा केली, यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपविभागीय प्रांतधिकारी भाऊसाहेब गलांडे, शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी श्री. जठार, वन विभागाचे अधिकारी श्री. पालवे यांच्यासह तलाठी एस. एस. सानप, तलाठी सतिष पलांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.सहसचिव तायशेटे यांनी चिंचोली (मोराची) येथील गावतलावाची पाहणी करून तलावाची साठवण क्षमता, देखभाल, दुरूस्ती व गावातील जलसंवर्धनाच्या कामाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. गावची लोकसंख्या त्यानुसार पाण्याची गरज, पीकपध्दती , भुजलस्थिती जाणून घेत गावाला जलस्वंयपूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतही त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. सरपंच रूपाली धुमाळ यांनी गावच्या जलस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.कान्हूर मेसाई येथे वनविभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचीही सहसचिव तायशेटे यांनी पाहणी केली. यावेळी वनपाल श्रीमती सी. ए. काटे यांनी वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भातील नियोजनबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच सिमेंट नालाबांधची पाहणी करून शेतीत काम करत असलेल्या शेतक-यांशी त्यांनी संवाद साधत गावातील जलस्थितीबाबत विस्ताराने जाणून घेतले. कान्हूर गावालगत असलेल्या चारा छावणीची पाहणी करून पशूपालक शेतक-यांशीही चर्चा केली. सरपंच दादा खर्डे यांनी गावच्या भूजलस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी राम यांनीही यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील भूजलस्थितीसोबत गावातील जलंसवर्धनाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिका-यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी ग्रामस्थ, महिला, शेतकरी, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.