पुणे दि.२५:- दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून मावळात स्थायी झालेल्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत चमकदार कामगिरीची दखल घेऊन दूधभाते नेत्रालयाचे डॉ अनिल दूधभाते यांनी तिला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने डॉ दूधभाते यांनी या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी तिच्या पालकांकडे धनादेश सुपूर्त केला. यावेळी संदीप मोरे, अरुणा जोशी, विनया कुलकर्णी, प्राची जोशी उपस्थित होते. राधा कोकरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती टाकवे बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये १२ वीच्या परीक्षेत वाणिज्य विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिने ८१. ६१ टक्के गुण कोणत्याही क्लासशिवाय दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातून ‘जेकेसीईटी’ची परीक्षादेखील ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असून ‘आ’यआयबीएम’ संस्थेत प्रवेश घेतला आहे. विमान वाहतूक सेवा क्षेत्रात आपली कारकीर्द घडविणार आहे. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉ दूधभाते यांनी आर्थिक मदतीचा हात देऊन राधाला प्रोत्साहन दिले आहे.कोकरे कुटुंब दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातून उदरनिर्वाह शोधत मावळात येऊन स्थिरावले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक पार्श्वभूमी फारशी अनुकूल नसतानाही शालेय शिक्षणात राधाने चमकदार कामगिरी करून दाखविली असून तिच्या गुणवत्तेला वाव देण्यात समाजातील सक्षम घटकांनी हातभार लावणेही आवश्यक आहे.