.बोरघर / माणगांव पावसाळ्यातील म्हातारा या नक्षत्रात जंगलात सर्वत्र निसर्गतः निर्माण होणारी आळंबी सद्या संपूर्ण जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व बाजारपेठेत आदिवासी समाजाच्या माध्यमातून विक्री साठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. आळंबीच्या विक्री पासून जिल्ह्यासह तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी समाजाला भरपूर पैसे मिळत आहेत. आळंबी मध्ये भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने या नैसर्गिक शाकाहारी भाजीला खवय्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे ही नैसर्गिक रानभाजी खूप महाग किंमतीने विकली जाते. सद्या ही आळंबी स्थानीय पारंपरिक पद्धतीने पळसाच्या पानावर वाटा पद्धतीने लावून शंभर रुपये एक पानावरील आळंबीचा वाटा या किंमतीने विक्री केली जाते. संपूर्ण कोकणासह रायगड जिल्हा आणि माणगांव तालुक्यातील जंगलात पावसाळ्यात विशेष करून याच अर्थात म्हातार्याच्या नक्षत्रात सर्वत्र निसर्गतः निर्माण होणाऱ्या आळंबी मध्ये धिंगरी, बटन, तेकोडे, कवठ इत्यादी प्रकार आढळून येतात. आळंबी तथा मशरूम ही बुरशी गटातील क्षणीक अल्पायु वनस्पती आहे. आळंबीला स्थानीय भाषेत आलबी, आळंबी, कुत्र्याची छत्री, भूदत्र, मशरूम इत्यादी नावाने ओळखली जाते. आळंबी आयुर्वेदिक औषधी गुणांनी युक्त असल्याने या हंगामी पौष्टिक रानभाजीला खवय्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आळंबीच्या विक्रीतून जिल्ह्यासह तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आदिवासी समाजाला आर्थिक रोजगार उपलब्ध होतो. सद्या जंगलात सर्वत्र आळंबी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने तालुक्यातील आदिवासी समाज दररोज स्थानिक बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आळंबी विक्री साठी घेऊन येत आहेत. त्यामुळे आळंबी खवय्यांची ही भाजी मोठ्या चढाओढीने घेण्यासाठी दररोज झुंबड उडत आहे.