वडवणी(दत्तराज आळणे) दि ३०:- बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकाचा विमा देण्यापासून डावलण्यात आले आहे. तब्बल साडेचार हजार शेतकऱ्यांना पीक विमा यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, विनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर वडवणीत भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांसह शवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शिवसेना खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. पीक विमा कंपनीने नौटंकी बंद करावी. आठ दिवसात पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा, असा इशारा मोर्च्यात देण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अनिल जगताप यांनी दिला. खरीप हंगामातील इतर पिकाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, याच हंगामातील सोयाबीनच्या पिकाचा विमा देण्यापासून साडेचार हजार शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयांवर धडकला. शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नाहर त्रास देत आहे. शेतकऱ्याचा हक्क असणाऱ्या या पीक विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले, त्यांना तातडीने विमा मिळावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या वेळी बोलतांना माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अन्याय सहन करायचा नाही अशी शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली आहे . न्यायाच्या बाजूने उभे राहायचे, पद असो किंवा नसो आम्ही शिवसैनिक आहोत. सामन्यांसाठी रस्त्यावर उतरणे आमचे काम आहे आणि हे काम आम्ही शेवटच्या श्वासापर्यत करणार आहोत. आदित्य ठाकरे राज्यात दौरा करत आहेत. उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे आहेत. वेळोवेळी ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. यापुढेही शिवसेना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. आठ दिवसात सोयाबीन पीक विमा शेतकऱ्याच्या पदरात पडला नाही तर आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडक देऊ, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला. यावेळी विनायक मुळे, शिवराज बांगर आदींनी भाषणे केली. यावेळी माजी तालुका प्रमुख विनायक मूळे, शिवराज बांगर, नागेश डिगे, युवराज शिंदे, मुन्ना पवार, संजय धपाटे, वचीष्ट शेंडगे, अशोक चाटे, किसन जाधव, प्रमिला माळी, नरेंद्र राठोड,जालिंदर चिनके, वैजीनाथ डिगे, बाळासाहेब लोकरे आदि सहभागी झाले होते.