पुणे दि ०७ :- पुणे शहरातील पूरग्रस्त कुटुंबियांना पुणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून स्थलांतरित करण्यात आलेले आहे.मनपा शाळांतून पूरग्रस्तांचे स्थलांतर केल्यानंतर तेथील मुलभूत सुविधा संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.पूरग्रस्तांची प्रत्येक शाळेतील संख्या विचारात घेता मोठ्या प्रमाणावर चहा,नाष्टा,दोन वेळेचे जेवण, वैद्यकीय सुविधा अशा प्रकारच्या सुविधा स्थानिक मनपा सभासद,कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था देत आहेत.
वरील पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांचे मदतीकरिता व त्यांना किमान भाजी-पोळी व वापरायोग्य सुस्थितीमधील जुने कपडे देण्यात यावेत अशी संकल्पना पुढे आली.पुणे महानगरपालिकेतील मुख्यलेखापाल कार्यालयातील सुप्रिया परदेशी संपर्क क्र. ९५५२५३४४५१ यांनी सदरची कल्पना मनपातील विविध खात्यातील कर्मचाऱ्यांपुढे मंडली व या कल्पनेस सर्वानीच पाठींबा दिला आहे.तसेच मनपा युनियननेही सहभाग दर्शविला आहे. व दि ०४ पासून सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केले व बरेच कर्मचारी पुढे आले.बऱ्याच सेवकांनी बिस्कीट पुडे,भाजी पोळी,बेकरी पदार्थ,व स्वतःच्या जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली आहे.या अभिनव कल्पनेस मोठा प्रतिसाद मिळू लागला व शिवाजी नगर गावठाण येथील मनपा शाळा क्र. १४ ,लालबहाद्दूर शास्त्री मनपा शाळेत कामगार पुतळा वसाहत,राजीव गांधी नगर येथील पूरग्रस्त तसेच शिवाजी नगर पोलीस लाईन पुणे ५ येथील वीर नेताजी पालकर शाळा क्र.२ व शिरीष कुमार शाळा येथील सुमारे ५०० पूरग्रस्तांना भाजी पोळी,अन्य खाद्यपदार्थ व कपडे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे व या अभिनव उपक्रमास मनपा सेवकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद वाढू लागला आहे.
मनपा सेवक व नागरिकांसाठी आवाहन करण्यात येते कि पूरग्रस्तांसाठी भाजी पोळी व जुने वापरायोग्य कपडे द्यावयाचे असल्यास अशा मनपा सेवक व नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या मनपा मुख्य भवनातील सुरक्षा विभागात आपली मदत सकाळी १० ते १२ या वेळात आणून दिल्यास मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पूरग्रस्तांना प्राप्त झालेली भाजी पोळी व कपडे वितरीत केले जातील,मनपा शाळेत पूरग्रस्त असेपर्यंत हा उपक्रम चालू राहील असे सुप्रिया परदेशी यांनी कळविले आहे.
या उपक्रमासाठी मनपातील श्रीपाद साळुंखे,मोटार सारथी सुरक्षा विभाग,मुख्यलेखा व वित्त विभागातील सेवक,आरोग्य विभागातील पुरुषोत्तम पवार, व अन्य सेवक,भवन विभागातील शुभांगी पारटे व सेवक अग्निशमन दलाचे विनायक माळी त्यांचे सहकारी,सुरक्षा विभागातील रवी सोनावणे, व सेवक अन्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेत आहेत.
सुरुवातील पहिल्याच दिवशी ५ पोती जुने वापरायोग्य कपडे व सुमारे ५०० पूरग्रस्त व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था या कर्मचाऱ्यांनी केली.सदरचा उपक्रम पाहून अन्य कर्मचारी व नागरिकही मोठ्या प्रमाणावर पुढे येत असल्याने सुप्रिया परदेशी यांनी सांगितले.
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था तेथील सारथी शाळेत करण्यात आलेली असून याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
स्थानिक मनपा सभासद यांचे वतीने चहा,नाष्टा,दुपार व रात्रीचे भोजन देण्यात येत आहे. दि, ०६ रोजी सकाळी ह्युमिनिटी फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेने अल्पोपहारची सोय केली आहे.दि.०७ रोजी येथील न्याती सोसायटी व वडगाव शेरी,स्वयंसेवी संस्थेतर्फे कपडे,सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले आहे.
दिनांक ४ ते आजतागायत मनपाचे वैद्यकीय पथकामार्फत पूरग्रस्तांकरिता वैद्यकीय तपासणी,औषधे देण्यात येत आहे.आज पूरग्रस्त भागातील पाणी कमी झाल्यामुळे सर्व भागात स्वच्छता करण्यात येवून औषध फवारणी करण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर यांनी सांगितले आहे.