मुंबई :दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र सरकारने कायदा लागू केला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे.प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणार्या दिव्यांगांना त्रास देणार्या अथवा अपमानास्पद वागणूक देणार्यांवर यापुढे अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद होवून त्याकरता दंड व सहा महिने ते पाच वर्षापर्यंतची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात असल्याने दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.अशी माहिती शासन मान्यता प्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, दिव्यागांसाठी त्रास देणार्यास कारावासाची शिक्षा ठोठावणारा कायदा (दि राईटस् ऑफ परसनस् विथ डिसअॅबिलिटीस अॅक्ट 2016) नुकताच केंद्र सरकारने पारीत केला आहे.त्यामधील कलम 92 अन्वये सदरच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सुरक्षेचा देखील अंतर्भाव केला आहे. त्यामुळे यापुढील काळात दिव्यांगांना समाजाकडून सन्मानाची वागणूक प्राप्त होईल. या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील असंख्य दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समाजाच्या विविध स्तरावर कार्यरत असणा-या दिव्यांगांना अनेकदा असंख्य अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा अपप्रवृत्तीकडून धमक्या त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रास दिला जात असल्याच्या असंख्य तक्रारी राज्य व केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अपमानास्पद वागणूक देणे, शारीरिक व मानसिक छळ करणे, धमकी देणे त्यांना आधार देणार्या साधनांना मुद्यामहून त्रास देणे अशा बाबतीतही कडक शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे.
दिव्यांगांना शिक्षण, नोकरी व व्यवसायामध्ये विेशेष सवलत, आरक्षण व आर्थिक अनुदान याचाही समावेश या कायद्यात करण्यात आला असून त्यामुळे या व्यक्तीदेखील स्वत:च्या पायावर ठामपणे उभे राहू शकतील. केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे दिव्यांगांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीला लागलेली आहे. या विधेयकामध्ये दिव्यांग महिलांचा अवमान अथवा औचित्यभंग केल्यास सक्त कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे.
या केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे स्वागत दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील,राज्य सचिव परमेश्वर बाबर,प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,हनुमंत अवघडे,राजेंद्र दिक्षित,धनंजय घाटे,श्रीम.चंद्रकला परदेशी,जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मोरे,पुंडलीक पाटील,सचिव इंद्रजित डांगे,सहसचिव मधूकर अंबाड,कोषाध्यक्ष अर्जुन बडे,श्रीम.संजिवनी गायकवाड,बाळासाहेब सोनसळे,शेषराव सानप,सिद्धेश्वर शेंडगे,ज्ञानेश्वर पालवे,दत्तात्रय गाडेकर,सविता ढाकणे,बाळासाहेब कांबळे,आर.पी,शिंदे,कुर्हे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी