पिंपरी दि, २४ :-चिंचवड परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) च्या जागेत विकसित झालेल्या रहिवाशी भागातील सदनिका संबधित नागरिकांच्या नावे झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी एमआयडीसीमधील सदनिका संबधित नागरिकांच्या नावे करून त्यांना पुर्ण मालकी हक्क बहाल कराव, अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शहरातील चिंचवड, संभाजीनगर, शाहूनगर भागातील एमआयडीसीच्या जागेत रहिवाशी भाग विकसित झालेला आहे. तेथील नागरिकांची हा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी आहे. त्या संदर्भात अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपरी चिंचवड एमआयडीसीमध्ये ८० ते ९० टक्के रहिवाशी सोसायटयांना पुर्णत्वाचा दाखला (कंप्लीशन प्रमाणपत्र) मिळाळेले नाही. एमआयडीसीच्या सध्याच्या नियमानुसार पुर्णत्वाचा दाखला न मिळालेल्या सोसायटीतील सदनिकांसांठी बँकेकडून कर्जपुरवठा होऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण सोसायटीसाठी पुर्णत्वाचा दाखला हवा, असा नियम करण्यात आलेला आहे.
यामुळे एमआयडीसीच्या जागेत घरे घेऊन राहत असलेल्या गरजू लोकांचे सदनिकांच्या आधारे कोणतेही व्यवहार होऊ शकत नाहीत. यामुळे सद्यस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एमआयडीसीमध्ये उपलब्ध असलेल्या सदनिका विकणे किंवा विकत घेणे अशक्य झालेले आहे. या पध्दतीमुळे राज्य शासनाचा महसूल देखील बुडतो आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात सदनिका घेतलेल्या ज्या नागरिकांचे व्यवहार निबंधक कार्यालयात पूर्ण झाले आहेत. त्या नागरिकांची नावे योग्य तो दंड आकारून एमआयडीसी दफ्तरी लावणे गरजेचे आहे. या सर्व नागरिकांची त्या वेळेच्या खरेदी नुसार योग्य ती आकारणी करुन सदनिकांची नोंद खरेदी झालेल्या मालकाच्या नावे करण्याचे आदेश द्यावेत, असे अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.