भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. यादिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात. आदरपूर्वक नमस्कार करतात. काही विद्यार्थी गुलाबाचे फुल देऊन तर काही विद्यार्थी एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. शिक्षक हे आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. सर्वच शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करतात. सर्वच शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरपूर्वक सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांमुळे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकतो. भविष्यातले शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, लेखक आणि काही विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. आणि या सर्व शिक्षकांमुळेच मुले विचार करतात, चांगले शिक्षण घेतात आणि मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतात. आपण जेव्हा पहिल्यांदा बालवाडीमध्ये शाळेत जातो तेव्हा आपल्याला या जगाची काहीच माहिती नसते त्यावेळी हे शिक्षक आपल्याला बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकवतात सर्व वस्तूंची माहिती देतात. तसेच आपण आपल्या आई वडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी शिक्षक घेतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मते घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. आपल्याला चित्रांवरून वेगवेगळ्या वस्तूंची माहिती करून देतात, जगभराच्या ज्ञान देतात. प्रार्थना म्हणायला शिकवतात आपल्यावर चांगले संस्कार करतात. अशाप्रकारे आपले हे शिक्षक आपल्याला घडवत असतात. या शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, गुरु शिष्यांमधील हे नाते कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो. यादिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे आपले प्रेम, मनोगत व्यक्त करतात. शाळेकडून सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. तसेच शेवटी शिक्षक सुद्धा आभारप्रदर्शन करतात. काही शाळांमध्ये मुले एक दिवसासाठी शिक्षक बनतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. डॉ. सर्वपल्ली यांच्याप्रमाणेच महात्मा फुले यांनाही शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले. महात्मा फुले नऊ महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. महात्मा फुले यांची बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आपल्या देशातील अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी १८४८ साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई यांच्यावर सोपविली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. हे सर्व करत असताना महात्मा फुले यांना अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असे पण सर्व सहन करूनही ते आपल्या मतावर ठाम होते. शाळेच्या मुख्याध्यापकपदी असलेल्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे सावित्रीबाई आणि त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. असे हे थोर समाजसुधारक आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे आपले खरंच गुरूच आहेत. शिक्षणाचे महत्व समजून सांगणारे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजसुधारकांना, शिक्षक, शिक्षिकांना या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकलन : बाळू राऊत