पुणे दि ०५ : – आज पासून तीन दिवस घरी आलेल्या गौरींचे पुणे शहरात घरोघरी सुंदर आरास करत, गोडधोडाचा नैवेद्य दाखवत, सुंदर साड्यांनी आणि दागिन्यांनी तिला सजवत भक्तांनी या माहेरवाशिणीचे कोडकौतुक केले.
कुटुंबात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येणा-या ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थात गौराईचे आज सोनपावलांनी घरोघरी आगमन झाले. विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ तीन-चार दिवसांनी येणा-या गौराईच्या आगमनांची कुटुंबात उत्सुकता असते. गौरीचा साजशृंगार, आरास आणि त्या जोडीला महापूजा व फराळ करण्यात अवघे कुटुंब दंग झाल्याचे चित्र आज पुणे शहरभर पहायला मिळाले.गणपरायाच्या प्रतिष्ठापनेमुळे शहरात सध्या सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण आहे. गणरायाच्या आगमनामुळे मंगलमय झालेल्या वातावरणात भर घालणारा सण अर्थात गौरी पूजनाचा सोहळा आज घरोघरी होत आहे. भाद्रपद षष्ठीला अनुराधा व मूळ नक्षत्रावर सोनपावलांनी येणा-या या ज्येष्ठा-कनिष्ठा आपल्याबरोबर सुख – समृद्धी, धन-धान्याची बरसात करतात. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी चैतन्य पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत गौरींसाठी मनमोहक, कल्पक आरास करण्यात महिला मग्न होत्या. कुणाच्या घरी खड्याच्या, कुणाच्या घरी फोटोतील, कुणाच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या, कुणाच्या घरी सुपारीच्या तर कुणाच्या घरी पितळी मुखवट्याच्या गौरी असतात. प्रथा-परंपरेनुसार त्यांची सजावट, त्यांची पूजा, त्यांचा नैवेद्य यांचे जंगी नियोजन घरोघरी पहायला मिळाले.आहे ज्यांच्या घरी उभ्या गौरी आहेत, अशा महिलांनी आदल्या दिवशीच त्यांना नवीकोरी साडी नेसविणे, दागिने घालणे, गौरींच्या आजूबाजूची सजावट, फळा-फुलांची आरास, लायटिंग, दिवे, फराळाच्या पदार्थांची मांडणी, हळदी-कुंकवाचे करंडे, साजशृंगार, वायनदान साहित्याची मांडणी आदी कामे करण्यावर भर दिला. गौरींच्या पाहुणचाराची तयारी करण्यात महिला मग्न झाल्या दिसत आहे आजपासून गौराईचे आगमन होत असल्याने ज्या कुटुंबामध्ये गौराई विराजमान होते. त्या कुटुंबात आनंद, उत्साह द्विगुणित होत आहे. गौरीची सर्व तयारी पूर्ण झालेली असल्याने सारेच जण गौरींची आतुरतेने वाट पहात होते. गौरी तीन दिवस माहेरवाशिणी म्हणून येतात. त्यात पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी महापूजा, मिष्टान्नाचे जेवण व त्यानंतर प्रसाद वाटप, हळदी कुंकू, तर तिस-या दिवशी पूजन, दही, दुधभातांचा नैवेद्य दाखवून गौरी विसर्जन केले जाते.