पुणे,दि.०६: -पुणे शहरात सेल्समनची दिशाभूल करुन मॉलमधील शॉपीतून ५ लाख ५ हजार रुपये किमतीची चार रॅडो कंपनीची ब्रॅंडेड घड्याळे चोरणाऱ्या मुख्य गुन्हेगारास गुन्हे शाखेने दिल्ली येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
विवेक मनवरसिंग रावत(३३,रा.फरिदाबाद , हरियाणा ) असे अटक आरोपीचे नाव आहे. या अगोदर त्याचे साथीदार आशिष कुशल विस्त, आकाश बालकिशन ढाका आणि रविंद्ररसिंग अमरजितसिंह (सर्व रा. दिल्ली ) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सुशांत सुभाष घोरपडे (रा. सिंहगड रस्ता ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमध्ये ईथॉस वॉच शॉपी आहे. 8 ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खरेदीच्या बहाण्याने दोनजण शॉपीमध्ये आले होते. त्यांनी सेल्समनकडून रॅडो कंपनीची ब्रॅंडेड घड्याळे पाहण्यासाठी हातात घेतली. त्यानंतर भामट्यांनी सेल्समनचे लक्ष विचलित करुन शॉपीतून 5 लाख 5 हजारांची चार घड्याळे चोरुन पळ काढला होता. या घटनेचा तपास करताना आरोपी दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आशिष, आकाश आणि रविंदरसिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शॉपीतून चार घड्याळे चोरल्याची कबुली दिली. त्यातील तीन घड्याळे घेऊन विवेक हरियाणाला पळाला होता. त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार , पोलीस कर्मचारी गणेश काळे, अशोक शेलार, सागर घोरपडे, सचिन ढवळे, भालचंद्र बोरकर, सुहास कदम यांच्या पथकाने केली.