पुणे दि. ०६:- पुणे जिल्ह्यातील मागील निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी पाहता, शहरी भागातील मतदार संघात मतदान कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक संतोष कुमार यादव यांनी आज केल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निरीक्षकांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी श्री यादव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवडणूक निरीक्षक चंदर शेखर, देव दत्त शर्मा, राजीव रतन, समीर वर्मा, गगनदीप सिंग ब्रार, मोहंम्मद शफाकत कमाल, दीपक सिंग, मिथीलेश कुमार, साजिदा इसलाम राशीद, पोलीस निरीक्षक आयुष मणी तिवारी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक संतोष कुमार म्हणाले, मतदार संघात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य द्यावे, मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवाव्यात. मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. सध्या पुणे परिसरात पावसाचे वातावरण पाहता, प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जाणारे रस्ते सुस्थितीत आहेत का? याची खात्री करून घ्यावी. मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.
मतदान प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष दक्षता घ्या, आचार संहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी. मागील काही निवडणुकांची आकडेवारी पाहता पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अशा ठिकाणावर विशेष भर देवून स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पीपीटी सादरीकरण करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा सादर केला. या बैठकीला सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.