उस्मानाबाद दि,१६ :– कळंब तालुक्यातील नायगांव पाडोळी येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका माथेफिरू तरुणाने चाकूहल्ला करून पळ काढला आहे. या हल्ल्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.
अजिंक्य टेकाळे असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून त्याने हा हल्ला का केला ? हे अजून समोर आले नाही. या घटनेमुळे नायगांव पाडोळी येथे तणाव वाढला असून ऐन विधानसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ खा. ओमराजे निंबाळकर हे नायगांव पाडोळी येथे गेले असता अजिंक्य टेकाळे नावाचा तरुण समोर आला. त्याने ओमराजेच्या हातात हात देवून नमस्कार केला आणि जवळचा चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ओमराजे निंबाळकर यांचे घड्याळ तुटले असून हाताला किरकोळ मार लागला आहे. त्यानंतर हा तरुण तातडीने फरार झाला आहे.
त्याने हल्ला का केला ? उपस्थित पोलीस काय करत होते ? कार्यकर्त्यांनी त्याला का पकडले नाही ? हे यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रशांत दिलीप नेटके प्रतिनिधी :- तपसे चिंचोली औसा लातूर