पुणे दि १८- पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उछ्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र(इ.१० वी) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे. दिनांक १५/१०/२०१९ पासून संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. या वेळापत्रकाबाबत काही सुचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात मागवण्यात आल्या होत्या त्यानुसार मंडळाकडून संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करुन १२ वी आणि १० वीचे संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. आता जाहीर केलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार परीक्षा होतील. मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.maharashtra.gov.in यावर जाऊन विद्यार्थी आणि पालक परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात.