पुणे दि.13: पुणे महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये घट व्हावी तसेच शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपसमितीने दर पंधरा दिवसांनी आढावा घेवून वेगाने उपाययोजना करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच महापालिकांच्या हद्दीत वाहतुकीच्या थांब्यासाठी उपलब्ध केलेल्या जमिनीवर वाहनतळ असल्याचे स्पष्ट फलक उभारून त्याची माहिती गुगलवर नागरिकांसाठी उपलब्ध करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात “पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्रा”तील वाहतूक समस्येबाबत विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, नगर रचना संचालक श्री पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यात किती टर्मिनलची आवश्यकता आहे, याची एकत्रित माहिती गोळा करावी. तसेच पालखी मार्गासह ज्या ठिकाणी वारंवार अपघात हातात अशा ब्लॅक स्पॉटमध्ये सुधारणा आणि दुरूस्ती करावी. शहरातील सर्व वाहतुक सिग्नलचे एकत्रित समन्वय असणे आवश्यक आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच महामार्गालत असणाऱ्या सेवा रस्त्यांवर असणारी अतिक्रमण हटवून सेवा रस्त्यांची दुरूस्ती तातडीने करावी. महामार्गावरील सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी वारंवार पाणी साठून राहते अशा ठिकाणी त्या पाण्याला मार्गीका काढून द्यावी.
पीएमआरडीएच्या क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याविषयी सांगता डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, रात्रीच्यावेळी महिलांना सार्वजनिक तसेच खासगी वाहन मिळत नसेल तर त्यांना घरी सोडण्यासाठी ‘ड्रॉपिंग’ची व्यवस्था उभारण्याच्या सूचना त्यांनी पोलीसांना दिल्या. तसेच 1090 या मदत दूरध्वनी क्रमांकाला अधिक प्रसिध्दी द्यावी. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून त्यासाठच्या उपायोजना कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस, एमआयडीसी, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्या सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.