नीरा नरसिंहपूर:दि.२१ :- देशात तसेच जगामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने चांगले बदल घडत आहेत, सदरचे चांगले बदल व शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन हे शिक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण मोलाची भूमिका बजावत आहे,असे मत पुणे जि.प.सदस्या अंकिता पाटील यांनी केले आहे.बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये बावडा व इंदापूर बीट मधील प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी ” निष्ठा ” प्रशिक्षण कार्यक्रमास गुरुवारी(दि.19) अंकिता पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना अंकिता पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. या प्रशिक्षणाने शिक्षकांचा व्यवसायिक विकास होणार आहे. शिक्षकांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ हा विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ज्ञानार्जनाचे काम सेवा म्हणून करावे,असेही आवाहनही यावेळी अंकिता पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले.याप्रसंगी पुणे येथिल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.दयानंद जेठनुरे, इंदापूर तालुका गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, महेंद्र रेडके प्राचार्य सी.टी.कोकाटे,शेषराव राठोड यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय तज्ञ राहुल जगताप यांनी तर आभार छाया धापटे यांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर जिल्हा पुणे