पिंपरी दि ३१ : – हिंजवडी आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर दिवे लावत असताना विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी दि. ३० सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.सागर आयप्पा माशाळकर वय २०, सागर कुपू पारंडेकर वय १९ राजू कुपू पारंडेकर वय ३५ तिघेही रा. बिजलीनगर (चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत. तर सुधाकर तलवार असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार भोईरवाडीतील जय गणेश कॉलनीच्या स्मशानभूमीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर घडला.पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर नामक ठेकेदाराने रस्त्यावरील दिवे लावण्याचे काम घेतले होते . मयत व जखमी हे रस्त्यावर नव्याने लावलेल्या पथदिव्यावर दिवे बसविण्याचे काम करत होते. रोलर शिडी ढकलत असताना वीज प्रवाह सुरू असलेल्या विद्युत तारा त्यांच्या लक्षात नआल्यान त्यामुळे ऍल्युमिनियम शिडीचा स्पर्श तारांना झाल्याने शिडीत वीजपुरवठा उतरल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.त्या वेळी काही अंतरावर चाललेल्या तलवार यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी बांबूच्या सहाय्याने त्या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांना वाचविताना तलवार हे देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर वाकडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत तिघेही खासगी कंत्राटदाराची माणसे होती. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडीचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी घटनास्थळी धाव घेतली.