पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रानुसार देशाची अर्थव्यवस्था बळकट करतानाच शेतकरी, महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांच्या कल्याणासाठी तरतूद करणारा सर्वंकष अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केला असून भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची सोळा कलमी योजना, प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्याच्या पंतप्रधानांच्या निर्धारासाठी भक्कम आर्थिक तरतूद, जिल्हा रुग्णालयांना जोडून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कल्पक योजना, इन्कम टॅक्समध्ये कपात करून मध्यमवर्गीयांना दिलासा, अनुसूचित जाती – जनजाती – ओबीसी यांच्या कल्याणासाठी भक्कम आर्थिक तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करणे आणि दुर्बल घटकांची काळजी घेणे यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे.
त्यांनी सांगितले की, देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला जोरदार चालना देण्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा आणि व्यावसायिक वातावरणाचा देशाला पुरेपूर लाभ व्हावा यासाठीही या अर्थसंकल्पात उपाय केले आहेत. बँकांतील ठेवींचे विमा संरक्षण एक लाखावरून वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कररचना सोपी करणासाठीची पावले आणि करदात्याच्या हक्कांची नोंद घेणे ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. एकूणच भारताची अर्थव्यवस्था भक्कम करून आर्थिक विकासाची नवी उंची गाठण्यासाठीची पावले या अर्थसंकल्पात आहेत.