श्रीगोंदा दि ०८ :- श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू ओढवला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील दत्ता गणपत सुतार वय ३५ हा तरुण गावातीलच शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून उपजीविका करत होता. त्यानी काही खाजगी सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते. मोठ्या दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते वेळेवर फेडता येत नसल्याने तसेच सावकाराच्या सततच्या वसुलीसाठी दारात येऊन, मारहाणीची धमकी देत शिवीगाळ करत असल्याने तो काही दिवसांपासून तणावात होता.
सावकारांचा त्रास असह्य झाल्याने, त्याने बुधवार दि.५ रोजी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले असल्याची माहिती समजते आहे. कुटुंबियांनी तातडीन उपचारासाठीे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार चालू असतानाच शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.त्याच्या पाठीमागे पत्नी नऊ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे.
चौकट :
श्रीगोंदा तालुक्यात खाजगी सावकारांचे पेव….
“गरजवंताला अक्कल नसते” या उक्तीप्रमाणे आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना हेरून, मध्यस्थमार्फत हे संपर्क करून अडचण किती महत्त्वाची आहे हे पाहून व्याजाचा दर ठरवून आठ दिवसांसाठी शेकडा १० ते १५ टक्के दराने गरजवंताला रक्कम दिली जाते. आठ दिवसात पैसे न आल्यास रक्कम दुप्पट तिप्पट वसूल केली जाते. रकमेचा बोजा वाढल्याने सर्वसामान्यांना फेडणे मुश्किल होते. परिणामी मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे तसेच अधिकार्यांचे वरदहस्त असलेले सावकार, पाशवी पध्दतीने वसुली करतात त्यासाठी साम दाम दंड भेद या प्रमाणे प्रसंगी मारहाण,शिवीगाळ करून जवळील मौल्यवान वस्तू घेऊन जातात. त्यामुळे या गोष्टी कडे सहकार निबंधकांसह स्थानिक पोलीस प्रशासनाने या गोष्टीत लक्ष घालून वरदहस्त लाभलेल्या सावकारांचा बंदोबस्त केला नाही तर अनेकांचा बळी जाऊ शकतो.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-योगेश चंदन