मुंबई दि २१ :-. पूर्व आयएएस प्रशिक्षण केंद्रामधील अल्पसंख्याक मुलांच्या विद्यावेतनात २ हजार रुपये वाढ करण्याचे आश्वासन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज दिले. विद्या वेतनवाढीची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने केली होती. त्या संबंधात आज मंत्रालयात बैठक पार पडली तेव्हा मलिक बोलत होते. याबैठकीला छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले, कार्याध्यक्ष सचिन काकड, सचिव विकास पटेकर आणि अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर या सहा ठिकाणी भारतातील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रे (पीआयटीसी) आहेत. या सर्व केंद्रात सन २०१८ पासून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ४००० देण्यात येत आहे. मात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुधारीत दरा प्रमाणे विद्यावेतन न देता केवळ दरमहा रु. २००० प्रमाणे विद्यावेतन देण्यात येत आहे. स्वतःचा निवास व भोजन खर्च भागवण्यासाठी रु. २००० ही अत्यंत तुटपुंजी रक्कम आहे. त्यामुळे या मुलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. मात्र आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या विद्यावेतनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे, असे सांगून रोहित ढाले यांनी मलिक यांचे आभार मानले.या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न आणि इतर अनेक समस्यांबाबत छात्र भारती पाठपुरावा करत राहील तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने गांभीर्यपूर्ण विचार करून येत्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागाला निधी वाढवून देणेही गरजेही आहे, असे ढाले यांनी सांगितले.
मुुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत