चिपळूण दि २८ :- सरस्वती शिक्षण संस्था ( गुणदे, आवाशी, शेल्डी, माणी) संचलित सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे (माध्यमिक) व गुरुकुल विद्यामंदिर गुणदे ( प्राथमिक) प्रशालेत गुरुवार दि.२७ रॊजी “मराठी राजभाषा दिन” साजरा करण्यात आला. या दिवसाला “मायबॊली मराठी भाषा दिन” ,“मराठी भाषा गौरव दिन” असेही संबॊधले जाते. महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातॊ. मराठी माणूस आता शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तर कॊणी नॊकरीनिमित्त जगाच्या कानाकॊप-यात पॊहॊचला आहे. म्हणूनच २७ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रात , देशभरात व जगभरात जिथे जिथे मराठी माणसे आहेत तिथे तिथे हा दिवस साजरा केला जातॊ. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत प्रशालेच्या परिसरात ग्रंथ दिंडी, काव्यमैफल, सामूहिक वाचन,मराठी भाषिक खेळ, वक्तृत्व स्पर्धा,पुस्तक प्रदर्शन,पथनाट्य यांसह इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक विश्वात तर चिमुकल्यांनी संत, साहित्यिक यांच्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान करत मराठीचा टिळा कपाळी लावला. प्रशालेच्या दर्शनी भागात ९ वीच्या विद्यार्थीनीनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सर्व विद्यार्थी प्रशालेत हजर झाल्यानंतर इ.१ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी “मी मराठी” चा बिल्ला लावला. परिपाठाला विद्यार्थ्यांना उपशिक्षक मयूर कदम यांनी ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ विषयी माहिती सांगितली.
परिपाठानंतर संस्थेचे सचिव श्री. सुभाषजी पवार यांच्या हस्ते गणेश पूजन, वरिष्ठ लिपिक दीपक पेढांबकर यांनी सरस्वती पूजन ,कनिष्ठ लिपिक जितेंद्र येरुणकर यांनी सदगुरु पूजन,ग्रंथ पूजन केले.उपशिक्षकश्री.नागरगोजे, श्री.कराडकर,उपशिक्षिका सौ.संसारे,श्रीम.आंब्रे यांनी दीपप्रज्वलन केले.
त्यानंतर मुलांची प्रशाला ते श्री गणपती मंदिर गुणदे कापवाडीपर्यंत मराठी भाषेचा जयघोष करत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.यावेळी मुलींनी नऊवारी साडी, फेटा तर मुलांनी सफेद सदरा व पायजमा, फेटा अशी वेशभूषा केली हॊती. मुलांनी परिधान केलेले भगवे फेटे जणू…. शिवरायांचा भगवा महाराष्ट्र दिसत हॊता. “लाभले आम्हांस भाग्य बॊलतॊ मराठी” या गीताने सारा शाळेचा परिसर दुमदुमला हॊता. यानंतर बालॊपासना घेण्यात आली.त्यामध्ये संस्थेचे सचिव सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले की ‘खऱ्या अर्थाने मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून ती सर्वांनी जपली पाहिजे. मधल्या काळात समाजमाध्यमांमुळे मराठी भाषा लोप पावते काय, अशी भीती व्यक्त केली जात होती; परंतु असे झाले नाही. या उलट समाजमाध्यमांवरच मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शासनानेही आता मराठी भाषा सक्तीची केली असून, ही आनंदाची बाब आहे. आजच्या उपक्रमाबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक,पालक यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. इ.१ ली ते ९ वी च्या सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार करुन आणलेल्या मराठी साहित्याची मांडणी टेबलावर केली हॊती. त्यामध्ये कविता, अभंग, विविध प्रकारचे शब्द, म्हणी, वाक्य्प्रचार , पॊवाडा इ. तक्ते व पट्ट्यांचा त्यात समावेश करण्यात आला हॊता.संस्थेचे सचिव श्री. सुभाषजी पवार, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.विचारे व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी साहित्याची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे तॊंड भरुन कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपआपल्या वर्गात मराठी गाणी, कविता गाऊन दाखविल्या.
दिवसभर उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी जोशी, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.विक्रांतजी आंब्रे,सर्व सन्मानीय संचालक परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
चिपळूण :- मयुर मंगेश कदम