पुणे,दि.०९ :- पहाटेचे प्रसन्न वातावरण, भक्तिरसाने भारलेले सूर आणि संगीताच्या स्वरांनी फुललेली दिवाळी… अशा सुरेल वातावरणात बाणेर येथील ऑर्चिड इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात ‘सुरश्वेता’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद रसिकांनी अनुभवला. विदुषी शैलाताई दातार यांच्या शिष्या श्वेता पाटील यांच्या मधुर आणि भावपूर्ण गायनाने उपस्थित संगीतप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
दिवाळीच्या मंगलमय पर्वाला संगीताची सुंदर किनार लाभलेल्या या कार्यक्रमात श्वेता पाटील यांनी आपल्या सुरेल आवाजातून गीतांचे बहारदार सादरीकरण केले. आवाजातील माधुर्य, सुरांवरील पकड आणि प्रत्येक गीतातून व्यक्त होणाऱ्या भावभावना यामुळे संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
वाद्यांच्या जुगलबंदीने कार्यक्रमाला लाभली रंगत!
या संगीत मैफलीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे अनुभवी वादकांची अप्रतिम साथसंगत. प्रत्यक्षात लता मंगेशकर,आशा भोसले यांना संगीत संयोजन केलेले विवेक परांजपे ,निनाद सोलापूरकर (सिन्थेसायझर), मंदार गोडसे (संवादिनी), नितीन शिंदे (तबला), शिरीष मल्होत्रा (सॅक्सोफोन), नागेश भोसेकर (पखवाज व ढोलक) आणि प्रतिक गुजर (पर्कशन्स) यांनी आपल्या वादनातून गायनाला सुरेख साथ दिली. विविध वाद्यांच्या सुरेल मेळातून संगीताचा एक वेगळाच अनुभव रसिकांना मिळाला.
राजरत्न पवार यांनी उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था सांभाळत प्रत्येक स्वराची गोडी रसिकांपर्यंत पोहोचवली. स्नेहल दामले यांच्या अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणखी वाढवली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवर आणि सर्व कलाकारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संगीत, स्वर आणि भावनांच्या अनोख्या मिलाफातून साकारलेल्या या मैफलीने उपस्थित रसिकांना दिवाळीची अविस्मरणीय सुरेल भेट दिली.
दिवाळीच्या पहाटेला स्वरांचा साज… आणि ‘सुरश्वेता’च्या गायनाने बाणेरमध्ये अवतरली खऱ्या अर्थाने सुरांची दिवाळी!


























