पुणे, दि. ९ नोव्हेंबर २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमातून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्या युद्धकौशल्याचा आणि ऐतिहासिक शस्त्रसंपदेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. शिवकालीन शस्त्रांचे जतन करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तसेच मुंबईत मंत्रालयाजवळ महत्त्वाच्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्याची जबाबदारी आपण घेऊ, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
शिव कामगार सेनेच्या वतीने सारसबाग येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला डॉ. गोऱ्हे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध ऐतिहासिक शस्त्रांची पाहणी करून आयोजकांशी संवाद साधला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, दीपावलीच्या निमित्ताने आपण दिवे लावून आनंद साजरा करतो. मात्र हा आनंद आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि पराक्रमाची महान परंपरा आहे. या इतिहासाचे स्मरण करून देणारे हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
शिव कामगार सेनेचे सुधीर कुरुमकर यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनात शिवतेज, शिवगर्जना मर्दानी पथक तसेच रणरागिणी पथकाने जतन केलेल्या शस्त्रांचा समावेश आहे. श्री. तिरळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चार दशकांहून अधिक काळ या ऐतिहासिक वारशाची जोपासना केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
शिवकालीन शस्त्रसंपदेच्या जतनासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी
अनेक ऐतिहासिक शस्त्रांची नावे आपण ऐकलेली असतात. मात्र ती शस्त्रे प्रत्यक्ष पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळत नाही. शेकडो शस्त्रांचे जतन, निगा आणि संवर्धन करणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे या उपक्रमाला कायमस्वरूपी स्वरूप देण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे जागेची मागणी करण्याबाबत प्रयत्न करू. एखाद्या नवीन भवनातही या प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच मुंबईत मंत्रालयाजवळील महत्त्वाच्या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ आणि संबंधित सर्वांना सहभागी करून घेऊ, अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
शस्त्रांचे दर्शन नव्हे, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा महत्त्वाची
शिवकालीन शस्त्रे ही केवळ युद्धाची साधने नसून शौर्य, शिस्त, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेची प्रतीके आहेत. आजच्या युवक-युवतींना या शस्त्रांचा इतिहास, त्यांचा उपयोग आणि त्यामागील युद्धकौशल्य समजणे आवश्यक आहे. विशेषतः मुलींनी मर्दानी खेळ आणि स्वसंरक्षणाच्या परंपरेतून प्रेरणा घ्यावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसोबत दीपावली साजरी करण्याच्या परंपरेचा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकऱ्यांशी संवादाचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ‘जय जवान, जय किसान’ या भावनेसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक आहे.
शेवटी, नागरिकांनी आपल्या मुलामुलींना हे प्रदर्शन आवर्जून दाखवावे. ऐतिहासिक शस्त्रांच्या माध्यमातून स्वराज्याचा इतिहास, शौर्य आणि राष्ट्राभिमानाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, असे आवाहन त्यांनी केले.
या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करणारे सुधीर कुरुमकर, श्री. तिरळे, शिवतेज, शिवगर्जना मर्दानी पथक, रणरागिणी पथक आणि सर्व संयोजकांचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन करून आभार मानले.

























