पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६ : पोलिस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. स्नेहल तावरे (संचालक, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट व स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे), डॉ. प्रकाश पंधरे (निवृत्त प्राचार्य), अविनाश हळवे, सुलभ खुटवड (मराठी लेखक व पत्रकार) तसेच मिलिंद शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल (पुणे ग्रामीण) उपस्थित होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक रविंद्र चौपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने यांच्यासह पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी केवळ साहित्य निर्मितीच केली नाही, तर मराठी भाषेला अभिमानाची ओळख दिली, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले. मराठी भाषेची उत्क्रांती, प्रचार-प्रसार आणि तंत्रज्ञानाशी जोडलेली वाटचाल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून तिचे शिक्षण परदेशातही दिले जाते, असेही नमूद करण्यात आले.












