पुणे,दि.२१ :-पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ७ ने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ७२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह एकूण १९ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहेत.
गोपनीय माहितीवरून सापळा रचून
१३ मार्च २०२६ रोजी युनिट ७ चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना एका संशयास्पद कारबाबत गुप्त माहिती मिळाली. सोलापूर पासिंगची एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार केसनंद-वाडेबोल्हाई रोडने गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी बोल्हाई माता मंदिराजवळ सापळा रचला.
कारच्या डिक्कीत सापडला साठा
संशयास्पद कारची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये बारदानच्या चार पोत्यांत २९ प्लास्टिक बॅगमध्ये पॅक केलेला ५८.५८ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह १७ लाखांचा मुद्देमाल जागीच जप्त केला.
घरावर छापा टाकून अधिक मुद्देमाल जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, मुख्य आरोपीने त्याच्या राहत्या घरी (धायखिंडी, जि. सोलापूर) आणखी गांजा साठवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिथे छापा टाकून आणखी १४ किलो ‘कमर्शियल क्वांटिटी’ गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण ७२ किलो गांजा पोलिसांच्या ताब्यात आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. भिवा कालिदास वाघमोडे (वय ३६, सोलापूर)
२. विष्णू भागवत वाघमोडे (वय २८, सोलापूर)
३. हरि श्रीपती ढवळे (वय ३२, करमाळा)
४. मनोज अनिल सुरवसे (वय २९, करमाळा)
कायदेशीर कारवाई:
या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ७ चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.











