पुणे,दि.७ :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपींकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यात साध्या वेशात तैनात असलेल्या पोलिस पथकाने एका महिला भाविकाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या महिलांना तत्काळ पकडले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.




























