पुणे,दि.१९ :- येवलेवाडी परिसरात व्यावसायिकाची हरवलेली २ लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि २ लाख ४० हजार रुपयांचा चेक कोंढवा बुद्रुक पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शोधून संबंधित व्यापाऱ्याच्या स्वाधीन केला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी येवलेवाडी भागात राहणारे फिर्यादी हे किराणा व्यावसायिक असून, त्यांच्या बालाजी ट्रेडर्स दुकानातून रोकड रक्कम २ लाख ५४ हजार रुपये व दोन सह्या केलेला २ लाख ४० हजार रुपयांचा चेक घेऊन मार्केट येथे किराणा खरेदीसाठी मोटारसायकलवरून जात होते. प्रवासादरम्यान त्यांची पैशांची बॅग गाडीच्या हँडलला लावलेली होती. प्रवासात ही बॅग पडून गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी मदतीसाठी तातडीने कोंढवा बुद्रुक पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक कारंडे यांनी तपास पथकातील कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्याच्या येण्याजाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सलग दोन दिवस बारकाईने तपासले. त्यामध्ये व्यापाऱ्याची पैशांची बॅग ब्यंकटेश गॅलक्सी सोसायटीजवळ रस्त्याच्या बाजूला पडल्याचे तसेच त्यानंतर एका पायी जाणाऱ्या व्यक्तीने ती बॅग घेऊन गेल्याचे दिसून आले.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ती व्यक्ती बॅग घेऊन ब्यंकटेश गॅलक्सी सोसायटीत गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीत जाऊन चौकशी केली असता बॅग घेऊन गेलेली व्यक्ती मिळून आली. चौकशीत त्या व्यक्तीने बॅग सापडल्याचे सांगून ती घरी नेल्याची माहिती दिली.
पोलिसांनी संबंधिताकडून संपूर्ण रोकड व चेक ताब्यात घेऊन व्यापाऱ्याला परत केले. हरवलेली रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाल्याने व्यापाऱ्याने कोंढवा बुद्रुक पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक कारंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार महेश बेदुगाडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, लक्ष्मण होळकर, अनिल बनकर, किशोर पवार, मयूर मोरे, रुपेश पाटील, सुजित मदन व विजय खेंगरे यांच्या पथकाने केली.




























