पिंपरी-चिंचवड,दि.२२ : – गणेशोत्सव व सार्वजनिक शांतता तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई केली. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित मंडळांचे डीजे साहित्य ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम व ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली होती. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळोवेळी सूचना तसेच लेखी स्वरूपात निर्देश देण्यात आले होते.
२० सप्टेंबर २०२६ रोजी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत एकूण १० गणेश मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी ८ ते १० गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर तसेच १ डीजे सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पीकर्ससह) असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. संबंधित गणेश मंडळे, डीजे मालक तसेच चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगवी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेशोत्सवाच्या उर्वरित कालावधीत तसेच गणपती विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणत्याही मंडळाने उच्च क्षमतेचे डीजे किंवा डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनिप्रदूषण करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधित डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर व डीजे कन्सोल जप्त करण्यात येतील. या कारवाईस मंडळांचे पदाधिकारी व आयोजक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



























