नवी दिल्ली दि 01: – कोरोनाच्या विषाणूचा देशात फैलावण्यात वेग २४ तासांत लक्षणीयरित्या वाढला असून संपूर्ण देशातील रुग्णसंख्या १७१८ वर पोचली आहे. रुग्ण संख्येची ही वाढ भयावह स्थितीत पोचण्याची लक्षणे मानली जातात.
महाराष्ट्रात सर्वाधिक ३२५ तर केरळमध्ये २४१ रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोनाचे २४ नवे रुग्ण असून एकूण संख्या ९७ वर पोचली आहे. यातील २४ जण तबलीगे मरकसच्या कार्यक्रमात सहभागी झालेले निजामुद्दीन भागातील असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि केरळपाठोपाठ उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणमध्ये कोरोनाबाधितांची मोठी संख्या आहे.तेलंगणामध्ये मृतांचा आकडा एका रात्रीत सहावर गेल्याने चिंतेचे वातावरण आहे.
आरोग्यमंत्र्यांचा आढावा आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोरोनाव्हायरसचा फैलाव समूह लागण होण्याच्या टप्प्यात जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक उपायांचा आढावा त्यांनी घेतला. कोरोनाच्या परिस्थितीवर पंतप्रधान कार्यालय आणि विशेष मंत्रिगट बारकाईने लक्ष ठेवून आहे. स्वतः पंतप्रधान मोदी दर तासाला आढावा घेत आहेत.