पुणे दि २० :- सेवा कार्यासाठी वाहून घेणं हिच रा.स्व. संघाची शिकवण असून, देशाचे लोकप्रिय नरेंद्र मोदी यांनी हा संस्कार जनमानसात रुजवला, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि ईनॅव्लर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त दिव्यांगांना शिधा वाटपासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी स्थानिक नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, शहर भाजपा सरचिटणीस आणि नगरसेवक दीपक पोटे, कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदे, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, स्थानिक नगरसेवक जयंत भावे, पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे, मधुकर पाठक, देवेंद्र भाटिया, राजेंद्र गादिया, सतिश कोंडाळकर, विनायक काटकर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके व अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले की, सेवा कार्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पूर्ण करणं हा रा.स्व.संघाचा संस्कार आहे. याच संस्काराद्वारे अनेक कार्यकर्ते जनसेवेचे कार्य करत आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाच संस्कार जनमानासात रुजवला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसादिनी देशभरातील कार्यकर्त्यांना सेवा सप्ताह साजरा करावा, आवाहन केले होते. याअंतर्गत देशभरातल्या दिव्यांगांना मदत करण्यास सांगितले होते. त्याला व्यापक समर्थन मिळत असून, देशभरातील लाखो दिव्यांगांपर्यंत मदत पोहोच झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व शासकीय अस्थापनांमध्ये 4 टक्के जागा या दिव्यांगांसाठी आरक्षित असतात. मात्र, त्या जागा पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. या सर्व जागा भरल्या गेल्या, तर दिव्यांग व्यक्ती बेरोजगार राहणार नाहीत. त्याचप्रमाणे, अर्थसंकल्पाच्या पाच टक्के रक्कम ही दिव्यांगांसाठी खर्च करणं हे कायद्यानुसार सक्तीचं आहे. पण तेही अनेकदा होत नाही. त्यामुळे यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी यावेळी नोंदवले.
दरम्यान, या कार्यक्रमात पुनीत जोशी यांच्या वतीने कर्वेनगर येथील जिम मधे उकडलेली अंडी विकून उदरनिर्वाह करणारे दिव्यांग उल्हास जौंजाळ यांना व्हील चेअर भेट देण्यात आली. तर क्रिएटिव्हच्या वतीने चहा विक्री करुन उदरनिर्वाह करु पाहणारे संतोष भालेराव यांना चहाचा मोठा थर्मास भेट देण्यात आला.