पुणे, दि. २८ :- पुणे परिसरातील एका गुन्हेगाराची हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असताना भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील माजी नगरसेवक विवेक महादेव यादव आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्तांच्या मान्यतेने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.विवेक महादेव यादव (वय 38), राजन जॉन राजमनी (38), हुसेन उर्फ इब्राहीम याकुब शेख (वय 27) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही कोंढवा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक महादेव यादव याने आपला प्रतिस्पर्धी विष्णू उर्फ बबलू गवळी याचा खून करण्यासाठी इतर आरोपींना सुपारी दिली होती.दरम्यान कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुशील दिवार यांना राजन राजमणि हा कोणाचातरी खून करण्यासाठी पिस्तूल जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी राजन आणि हुसेन या दोघा आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून तीन गावठी पिस्टल, 6 मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत विवेक यादव यांनी खून करण्यासाठी सुपारी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली होती तर टोळी प्रमुख असलेल्या विवेक यादव याला 22 जुलै रोजी गुजरातच्या सीमेवरून अटक करण्यात आली होती.आरोपी विवेक महादेव यादव यांनी गुन्हेगारांची टोळी तयार करू होळी मधील सदस्यांच्या मदतीने बेकायदेशीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच इतर गुन्हेगारी टोळ्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विवेक यादव हा इतर साथीदारांच्या मदतीने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी त्याच्यावर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयात पाठवला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी विवेक यादव आणि टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश पारीत केले आहेत.